कर्जत : विनाकारण पोलिसांना वेठीस धरणे, फेक कॉल करून खोटी माहिती देणे आता कुणालाही महागात पडू शकते. प्रसंगी विविध कलमांखाली गुन्हाही दाखल होऊ शकतो. आता असाच प्रकार कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे घडला आहे. पोलिसांना विनाकारण वेठीस धरणाऱ्या व दारूचे सेवन करून वेगळ्याच तक्रारी करणाऱ्या दोघांना कर्जत पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
हनुमंत संजय भगत (वय- ३८), व अनिल भाऊसाहेब भगत (वय- ४३) (रा. दोघेही दुरगांव ता. कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार शाहूराज तिकटे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दुरगाव (ता. कर्जत) येथे बेकायदेशीर काही लोक दारू विक्री करत आहेत. त्यामुळे मला व गावामधील लोकांना त्रास होत आहे. व त्याठीकाणी तत्काळ पोलीस मदत पाठवावी’ अशा आशयाचा संबंधिताने ११२ या प्रणालीवर कॉल केले. असे ६ वेळा कॉल केले होते. रात्री ८. २० मिनिटांनी पुन्हा कॉल आल्याने त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शाहूराव तिकटे, नितीन नरुटे, बळीराम काकडे हे दूरगाव या ठिकाणी गेले.’
यावेळी तक्रारकर्त्याच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता तक्रारकर्ता व त्याचा साथीदार चौकात वेगळ्या परिस्थितीत आढळून आले. पोलिसांनी त्यांना कुठे दारू विक्री होत आहे ते सांगा? अशी विचारणा केली. यावेळी दोघेही अडखळत व अस्पष्ट उत्तर देत होते. त्यांची नावे विचारले असता वरीलप्रमाणे सांगितली. तसेच ‘दारुविक्रीबाबत आम्हाला काहीही माहिती नाही’ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्यान, कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता दोन्हीही इसम दारूच्या नशेत आढळून आले. तसेच मोठमोठ्याने आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा कलम ८५ (१) प्रमाणे त्यांच्यावर कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित, पोलीस जवान शाहूराज तिकडे, नितीन नरोटे, बळीराम काकडे यांनी केली आहे.