लोणी काळभोर : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर ऑईलने भरलेल्या टँकर चालकाकडे 10 लाखांची खंडणी मागून, एका बोगस पत्रकाराने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने अडीच लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार, कवडीपाट टोल नाक्याजवळ शुक्रवारी (ता. 28 जून) उघडकीस आला होता. या खंडणीच्या प्रकरणात गुन्हे शाखेचे दोन पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचे उघड झाल्याने दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. यामुळे पुणे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ज्ञानदेव गोरख गिरमकर व शिरीष श्रीहरी गोसावी असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर राहुल मच्छींद्र हरपळे (वय- 35, रा. फुरसुंगी ता. हवेली) असे बोगस पत्रकाराचे नाव असून त्याच्या दोन अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाळू आण्णा चौगुले (वय- ४४, धंदा चालक, चिंचवड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू चौगुले यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, त्यांच्या तेलवाहू टॅंकरवर अब्दुल शेख हे चालक म्हणुन काम करतात. शुक्रवारी पहाटे अब्दुल शेख हे टँकर घेऊन कवडीपाट टोलनाक्यावरून जात असताना, लाल रंगाच्या स्विफ्टमधून आलेल्या तिघांनी टँकर अडविला. गाडीतून उतरलेल्या तिघांनी आपण पोलिस असल्याचे सांगत, अब्दुल शेख यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच टँकरच्या मालकाला बोलव, अन्यथा केस करण्याची धमकीही दिली. तसेच टँकर सोडण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती राहुल हरपळे व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी चौगुले यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले होते. याप्रकरणी तिघांवर हडपसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खंडणी, दारु विक्री, दारु वाहतूक यासारखे आणखी काही गुन्हे राहुल हरपळे आणि त्याच्या पत्नीवरही हडपसर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर हडपसर भाजी मार्केटमधील एकाला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याच्या नावाखाली लुटल्याचा गुन्हाही हरपळे याच्यावर दाखल आहे. कवडीपाट येथील अडीज लाख रुपये खंडणीच्या गुन्ह्याच्या पोलीस कर्मचारी ज्ञानदेव गिरमकर व शिरीष गोसावी हे सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणात बोगस पत्रकार राहुल हरपळे याला पोलीस कर्मचारी गिरमकर व गोसावी यांनी मदत केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.