पुणे : जेवण केलेले बिल मागितल्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने हॉटेलच्या कामगारास जबर मारहाण करुन त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (ता. १२) संध्याकाळी मुंबई-बंगळुरू महामार्गावर घडली आहे.
किशोर कोईराला असे अपहरण करून मारहाण केलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी शारदा निलेश भिलारे (वय ३८, रा. भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
योगेश सर्जेरावर पार (वर-२८, रा. नगर,), रवींद्र सखाहरी कानडे (वय-४१), रुपेश अशोक वाडेकर (वय-३८), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय-३२), नितीन अशोक वाडेकर (वय-३२, रा. रासदर, नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा भिलारे या हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांचे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील कात्रज बोगद्याजवळ रानमळा नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये वरील पाचजण जेवण करण्यासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर किशोर कोईराला याने जेवणाचे बिल मागितले. यावेळी आरोपींना बिल मागितल्याचा राग आला. व त्यांनी किशोर याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, शारदा भिलारे यांना धमकावून उद्या तुम्ही याच्या मरणाची खबर ऐकाल अशी धमकी देत त्यांनी कोईरालाला त्यांच्या चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसवून घेऊन गेले. त्यास आणखी जबर मारहाण करुन काही अंतरावर सोडून देत आरोपी पसार झाले. याप्रकरणी भिलारे यांनी तत्काळ भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील पाच आरोपींना अटक केली आहे.