पुणे : कपडे धुताना पाय घसरून विहरीत पडलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कुकडेश्वर (ता. जुन्नर) येथे घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
सागर बाळू दिवटे आणि नाजूका सागर दिवटे अशी मृत्यू झालेल्या पती पत्नीची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर हा एक आदिवासी भाग आहे. येथील सागर दिवटे यांचा ६ महिन्यांपूर्वी नाजूका दिवटे यांच्याशी विवाह झाला होता. नाजूका दिवटे ही महिला कुकडेश्वर येथील आपल्या घराजवळ असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती.
कपडे धूत असताना नाजूका यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या. हे पाहताच पत्नीला वाचवण्यासाठी पती सागर दिवटे यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, त्यांना पत्नीला वाचवण्यात यश आले नाही. आणि दोघांचाही विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर काही वेळाने विहिरीच्या काठावर गाणी सुरू असलेला मोबाईल दिसला. तर विहिरीत तरंगणारी बादली दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
अवघ्या सहा महिन्यातच दोघांच्याही संसाराचा असा शेवट झाल्याने शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.