पुणे : आपला मुलगा तिच्या आजीकडे सतत जात असल्याचा राग मनात धरून सुनेने आपल्या सासूला गजाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरवली (ता. बारामती) येथून उघडकीस आली आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताराबाई दत्तात्रय पोंदकुले (वय ६०, रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे) असे फिर्याद दिलेल्या सासूचे नाव आहे. तर, सून रेखा दीपक पोंदकुले (रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, समोवार (ता. १०) रोजी चार वाजण्याच्या सुमारास सासू ताराबाई पोंदकुले भांडी घासत असताना, यावेळी सून रेखा हिने आपला मुलगा आला आहे का? अशी विचारणा केली. यावेळी माझ्याकडे स्वराज आला नसल्याचे ताराबाई पोंदकुले यांनी सांगितले.
दरम्यान, माझा मुलगा तुझ्याकडे सारखा का येतो?, असे म्हणून सासूला मारहाण करत, साडीच्या पदरात लपून आणलेला लोखंडी गज बाहेर काढत सून रेखा हिने आपल्या सासूच्या डोक्यात मारली. यावेळी सासू ताराबाई पोंदकुले यांनी गज धरून हाताने जोरात धक्का मारत स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. आणि माळेगाव पोलीस ठाण्यात या घटनेबद्ल फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.