पुणे : पुण्यातील मुंकुंदनगर येथे राहणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन तीस लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकणी चार्टर्ड अकाउंटंट यांनी गुन्हे शाखेकडे फिर्याद दिली होती.
किरण रामदास बिरादार (वय. २४, रा. उदगीर मांजरी, सध्या रा. पुणे स्टेशन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण बिरादार याने फिर्यादी यांना व्हॉट्सअॅप चॅटींग करुन दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसचे खंडणीची रक्कम घेऊन पीएमसी बिल्डिंग येथे बोलावले. फिर्यादी या घटनेची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनला दिली.
त्यांनुसार पोलिसांनी पीएमसी येथे सापळा रचला. मात्र आरोपीला पोलीस आल्याचा संशय आल्याने त्याने फिर्यादी यांना पीएमसी येथे न येता गरवारे ब्रिज खाली येण्याचा मेसेज केला. त्यानुसार पथकाने गरवारे ब्रिज परिसरात वेशांतर करुन सापळा रचला. आरोपीने फिर्यादी यांना पैशांची बॅग एका झुडपात ठेवण्यास सांगितले.
आरोपीने बॅग घेऊन जात असताना पोलिसांनी आरोपीला पळून जाताना अटक केली. आरोपी विरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.