पुणे : खेड-शिवापुर येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह २ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हा निर्णय न्यायाधीश पी पी जाधव यांच्या खंडपीठाने दिला आहे.
दिनेश हरी भालेराव (वय-२६, रा खेड शिवापूर ता. हवेली जि पुणे) अशी शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश भालेराव याने अल्पवयीन मुलीला भाजी आणण्याचा बहाणा करून, अल्पवयीन मुलीला मोटरसायकलीवर शिवापुर गावाच्या हद्दीतील कंजारभट वस्ती परिसरातील डोंगरात नेवुन जबरदस्तीने बलात्कार केला. आणि याची कोठेही वाक्यता केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने मुलीवर वारंवार बलात्कार केला. सदर गुन्हा हा सन २०१८ ते जुलै २०१९ या दरम्यान घडला आहे.
त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजगड पोलिसांनी आरोपी दिनेश भालेराव याला अटक केली होती.
आरोपी दिनेश भालेराव याला शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाय आज मंगळवारी (ता.१८) हजर केले असता, सरकारी वकील किरण साळवी यांनी सदर केलेले पुरावे ग्राह्य धरून, न्यायाधीश पी पी जाधव यांच्या खंडपीठाने आरोपी दिनेश भालेराव याला जन्मठेपेसह २ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठाविली आहे.
दरम्यान, या खटल्यात सरकारी पक्षातर्फे वकील किरण साळवी यांनी कामकाज पहिले. तर त्यांना सदर गुन्ह्यात प्रभारी अधिकारी सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील मनोजकुमार नवसरे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, तपासी अंमलदार समीर कदम आणि पोलीस कर्मचारी मंगेश कुंभार यांची मदत मिळाली.