लोणी काळभोर, (पुणे) : घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या तीन चोरट्यांनी घरमालकाला कोयत्याने मारहाण करून कपाटातील रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी २४ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.
सचिन चंद्रकांत भोसले, नितीन किशोर काळे (वय-२५. रा. दोघेही खरातवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), कृष्णा शेतकरी काळे, (वय- ४५, रा. टाकळी तांदळी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर अशी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. याबाबत बबन रामभाऊ भामे, रा. मावडी क.प, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २८) रात्री २ वाजण्याच्या सुमारास चोरी करण्यासाठी आलेल्या तीन अज्ञात इसमांनी बबन भामे यांचे घरी प्रवेश केला होता. अज्ञात इसमांकडून कडी कोयंडाचा आवाज झाल्याने घरातील फिर्यादी हे जागे झाले असता अज्ञात चोरांपैकी २ आरोपी यांनी फिर्यादी यांना ढकलून देऊन, त्यातील एक आरोपी याने त्याचे हातातील कोयत्याने फिर्यादी यांचे डोक्यावर वार केला. डोक्यावर वार केल्याने डोक्यातुन रक्त येताच आरोपी पळून गेले होते. तसेच त्यातील एकाने कपाटातील २ हजार व कागदपत्रे घेऊन पळून गेले होते.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता सदर गुन्ह्याचे तपास कामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते. सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा करून आरोपी श्रीगोदा, जि. अहमदनगर परिसरात पळुन गेले आहेत.
दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी येथे सापळा रचून वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सदरच्या गुन्ह्याबाबत त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत आपली खोटी नावे सांगितली. बातमीदार आणि फिर्यादी यांनी सांगितलेले वर्णन याचे मदतीने सदर गुन्हा हा वर नमूद आरोपी यांनीच केल्याचे स्पष्ट झाले असून वर नमूद ३ आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. तसेच सचिन भोसले याच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यात तो गेली ४ वर्षे फरार आहे. तसेच त्याचेवर चोरी, घरफोडी यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा काळे याच्यावर मारामारी तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना पुढील तपास कामी जेजुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, निरीक्षक गणेश जगदाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, अमोल शेडगे, धिरज जाधव, दगडू विरकर यांनी केली आहे.