पुणे : विमाननगर परिसरात एका शिक्षिकेने ७ वर्षीय विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना विमाननगर परिसरातील भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल येथे घडली आहे.
याप्रकरणी मुलाचे वडील अश्रफ मेहबूब शरीफ यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शिक्षिकेला अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील वडगाव शिंदे रस्त्यावर भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल आहे. या स्कूलमध्ये अरहन शरीफ (वय ७) हा शिकत आहे. १५ सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या मुलाचे आणि शाळेतील काही मुलांचे भांडण सुरू होती. ही गोष्ट शिक्षिकेला समजल्यानंतर म्युजिक टीचर असलेल्या शिक्षिकेने अरहान याचे तोंड जोरात दाबून धरले. त्याला मारहाण केली. त्याचे भिंतीवर दोन वेळा डोके आपटले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला क्लास मधून काढून टाकेन अशी भीती घातली.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर अरहान हा दबावाखाली होता. त्यामुळे तो आजारी पडला. याबाबत आर वडिलांना शंका आल्याने वडिलांनी विश्वासात घेऊन त्याला विचारले. त्यानंतर त्याने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी विमानतळ पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत.