लहू चव्हाण
पांचगणी : चारित्र्यावर संशय घेऊन पती, सासू, व सासऱ्याने सुनेला मारहाण करून अंगावर डिझेल ओतून जिवंत जाळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार भिलार (ता. महाबळेश्वर) येथे नुकताच घडला आहे.
आसमा मोहसीन डांगे (वय- २७, रा. भिलार, ता. महाबळेश्वर) असे जिवंत जाळून जिवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी आसमा यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासू सायरा जलाल डांगे, सासरे जलाल बशीर डांगे, पती मोहसीन जलाल डांगे यांच्या विरोधात पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ०३) आसमा डांगे सायंकाळी सात वाजण्याच्या भिलार येथील त्यांच्या घरी बसल्या होत्या. यावेळी त्यांचे सासरे जलाल डांगे हे दारू पिऊन आले होते व येताना हातामध्ये एका बॉटलमध्ये डिझेल घेऊन आले होते. घरी आल्यानंतर शिव्या देऊ लागले व आसमा यांचेवर वर संशय घेऊन तू बाहेर जातेस असे म्हणून आसमा व पती मोहसीन यांना मारहाण करू लागले.
दरम्यान, यावेळी सासरे, सासू, व पती मोहसीन यांनी त्याच कारणावरून मारहाण करून त्यांनी बॉटलमध्ये आणलेले डिझेल सासू सायरा व सासरे जलाल यांनी मिळून आसमाचे अंगावर बाटलीतले डिझेल ओतून तिला पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
अशी तक्रार पाचगणी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार वरील तिघांच्या विरोधात पाचगणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करीत आहेत.