पुणे : औंध येथील तरुणीचा एकतर्फी प्रेमातून खून करुन पसार झालेल्या संशयित आरोपी असलेल्या तरुणाने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रतीक ढमाले असे आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर श्वेता रानवडे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्वेताचे नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघेजण लग्न करणार होते. परंतु तरुणाची वर्तणुक योग्य नसल्याने तिने त्याच्यासोबत असलेले संबंध तोडले होते. त्यामुळे आरोपी तरुण तिच्यावर चिडला होता. बुधवारी दुपारी श्वेता औंध जकात नाका परिसरातून घरी जात होती. त्यावेळी आरोपीने तिला आडवले.
दरम्यान, आरोपी तरुणाने सोबत आणलेल्या चाकूने श्वेताच्या गळ्यावर सपासप वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला.
दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. यावेळी प्रतीकच्या मागावर पोलिसांची पथके होती. गुरवारी सकाळी प्रतीकने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आले. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.