लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावर दोन चारचाकी, दुचाकी आणि कंटेनर या चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर(ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर वस्तीच्या परिसरात राजलक्ष्मी कार्यालयासमोर रविवारी (ता.११) दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.
रमजान गुलाब शेख (वय-५०, नोकरी-शिक्षक, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर), आकांक्षा भोसले (वय- माहिती नाही. रा. उरुळी कांचन, ता. हवेली), सुनील भुजबळ (माहिती नाही रा. लोणी काळभोर, ता. हवेली) व अन्य एक ( नाव समजू शकले नाही) यांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमजान शेख हे त्यांच्या पत्नीसोबत हडपसर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी चालले होते. तर आकांक्षा भोसले या त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त चालल्या होत्या. दोन्ही गाड्या पुणे सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने एका पाठोपाठ चालल्या होत्या.
आकांक्षा भोसले या गाडी चालवीत असताना, त्यांची गाडी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर वस्तीच्या परिसरात राजलक्ष्मी कार्यालयाच्यासमोर आली असता, आकांक्षा ओव्हरटेक करीत असताना, त्यांच्या गाडीवरील ताबा सुटला आणि रमजान शेख यांच्या गाडीला अचानक समोर आल्याने दोन्ही गाड्यांची ठोसर बसून एकमेकांमध्ये अडकल्या.
त्यानंतर दोन्ही गाड्या रस्त्याचा दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेल्या. व रस्त्याच्या शेजारी थांबलेल्या दुचाकी आणि कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात सुनील भुजबळ यांची दुचाकी चक्काचूर झाली आहे.
दरम्यान, हा अपघात इतका विचित्र होता कि, पुण्याच्या दिशेने जाताना दोन कारचा अपघात झाला दोन्ही कार एकमेकांत अडकल्याने रस्त्याचा दुभाजक ओलांडून सोलापूर कडील रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी व कंटेनरला धडक दिली. मात्र सुदैवाने यावेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जाताना एकही वाहन आले नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्याची सुरक्षा वाऱ्यावरच…
पुणे सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर असलेल्या लोखंडी कुंपणाच्या जाळ्या वाकड्या तसेच मोडलेल्या अवस्थेत असून सेवा रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. विविध व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायाची जाहिरात म्हणून बोर्ड लावलेले आहेत.
लोणी काळभोर ते उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागाचा असमतोल, कमी उंचीचे रस्ता दुभाजक, पुसलेले झेब्रा क्रॉसिंग, खचलेल्या साईड पट्टया, मुख्य रस्ता व सेवा रस्त्यादरम्यान तुटलेल्या जाळ्या, धोक्याच्या व अपघाताच्या ठिकाणी आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.