यवत : मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने स्फोटक पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर यवत पोलिसांनी कारवाई केली. केडगाव चौफुला ते सुपा रोडवरील केदारी फार्मजवळ पोलिसांनी सापळा रचून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटिंग वायर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिवसिंह किशोरसिंह राणावत (वय 58, सध्या रा. देउळगाव गाडा, ता. दौंड; मूळ रा. राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर शुभम समर्थ साठे आणि भागचंद शर्मा (तिरुपती एंटरप्रायझेस) यांच्याविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनोद उध्दव काळे यांनी सरकारतर्फे यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलिस ठाण्याच्या पाटस दुरक्षेत्रातील पोलिस पथक पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलिस निरीक्षक सुधीर कदम यांना एका व्यक्तीकडून दुचाकीवरून अवैधरीत्या स्फोटक पदार्थ नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेत केडगाव चौफुला येथील सुपा रोडवर केदारी फार्मजवळ सापळा रचला. त्यावेळी शिवसिंह राणावत याला 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.

झडती घेतली असता त्याच्याकडे जिलेटिन कांड्यांचा 25 किलो वजनाचा बॉक्स आणि सुमारे 375 मीटर लांबीची डेटोनेटिंग वायर आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी स्फोटक पदार्थांसह सुमारे 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 10 हजार रुपये किमतीची दुचाकी, 3 हजार रुपये किमतीचा जिलेटिन कांड्यांचा बॉक्स आणि 3 हजार रुपये किमतीची डेटोनेटर वायर यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या चौकशीत राणावत हा ट्रॅक्टरवर ब्लास्टिंगसाठी होल करण्याचे काम करीत आहे. त्याने ही स्फोटके शुभम समर्थ साठे याच्याकडून मिळाल्याचे, तर शुभम साठे हा भागचंद शर्मा यांच्या तिरुपती एंटरप्रायझेस येथून स्फोटके खरेदी करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या प्रकरणी शिवसिंह राणावत, शुभम समर्थ साठे आणि भागचंद शर्मा (तिरुपती एंटरप्रायझेस) यांच्याविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्फोटक पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक, निष्काळजीपणा आणि मानवी जीवितास धोका निर्माण केल्याच्या आरोपांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक सुधीर कदम, पोलिस हवालदार नुतन जाधव आणि पोलिस शिपाई विनोद काळे यांच्यासह पाटस दुरक्षेत्रातील पोलिस कर्मचारी सहभागी होते. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर कदम तपास करीत आहेत.







