सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून 22 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे घडली. सचिन अभिमान सासवे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वळसंग पोलिसांनी धोंडीबा हणमंत क्षेत्री आणि त्याचा मुलगा आयुष धोंडीबा क्षेत्री, दोघेही रा. आहेरवाडी, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सासवे हा शनिवारी रात्री शेतातील वस्तीवर नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेला होता. रविवारी पहाटे त्याच्यावर कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सचिनच्या मानेला, गळ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटना समोर आल्यानंतर सचिनच्या चुलत भावाने याची माहिती त्याचे वडील अभिमान सासवे यांना दिली. त्यानंतर त्यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला.

दरम्यान, घटनेच्या आदल्या दिवशी धोंडीबा क्षेत्री हा हातात कुऱ्हाड घेऊन गावात फिरताना काही जणांनी पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच सचिनच्या अनैतिक संबंधांबाबत धोंडीबा क्षेत्री हा गावात चर्चा करत असल्याचेही समोर आले. त्यामुळे या हत्येप्रकरणी धोंडीबा क्षेत्री आणि त्याचा मुलगा आयुष क्षेत्री यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वळसंग पोलिसांनी तपासाला वेग देत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.







