बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पवार कुटुंबातील उमेदवार देणे ही चूक होती, असे अजित पवारांनी म्हटले होते. यापुढे पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष होणार नाही, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमध्ये आमच्याकडून तरी पवार विरुद्ध पवार अशी राजकीय निवडणूक होणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी गट आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून पॅनेल उभे करण्याची तयारी सुरू आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे चित्र असून सोमेश्वर कारखाना निवडणुकीत दोन्ही गट स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील ही पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनीही इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच भाजप आणि शिवसेना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी चर्चेतून मार्ग काढून निवडणूक लढवण्याबाबत भूमिका मांडली होती. मात्र, अद्याप युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार नेतृत्व करत आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्यासोबत युतीबाबतही अद्याप चर्चा झालेली नसल्याची माहिती आहे. युती झाली तर एकत्रितपणे निवडणूक लढवू, अन्यथा स्वतंत्र पॅनेल उभे करू, अशी भूमिका दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही प्रयत्न होतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.







