लोणी काळभोर (पुणे) : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ च्या पथकाने लोणी काळभोर, शिंदवणे, व उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत अवैधरित्या गावठी (हातभट्टी) दारू तयार करीत असलेल्या अड्ड्यावर मंगळवारी (ता. १३) पहाटे छापा टाकला आहे.
याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ च्या पोलिसांनी ७ गुन्हे दाखल केले असून शिंदवणे येथील भट्टीमालक असणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शिवाजीनगर कोर्ट क्र. ७ येथे हजर करण्यात आले आहे.
या छाप्यात पोलिसांनी दोन टेम्पोसह सुमारे ७ लाख ४१ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे. १४ हजार ३०० लिटर तयार रसायन, २०५० लिटर तयार गावठी दारू जागीच नष्ट केली आहे.
सदरची कारवाई आयुक्त कांतीलाल उमाप, सुनिल चव्हाण यांच्या आदेशानुसार, पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक सी. बी. राजपुत, उपअधीक्षक संजय आर. पाटील, युवराज एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी शिंदे, समीर पाटिल, बाळासाहेब ढवळे दुय्यम निरीक्षक रघुनाथ भोसले, बी. नेवसे, एस. कानेकर व सर्वश्री जवान एस.बी. मांडेकर, के. आर. पावडे, जी. बी. वाव्हळे, एस. घुले, सी. इंगळे यांनी केली आहे.