मावळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवून मावळ तालुक्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री केंद्रांवर रविवारी (ता.२१) आणि सोमवारी (ता.२२) छापे मारले आहेत. या धाप्यांमध्ये ८ जणांना अटक केली आहे. तर सुमारे १ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तळेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक क्रमांक १ला मावळ तालुक्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री केंद्र असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने भरारी पथकाने मावळ तालुक्यातील तब्बल ३८ हॉटेल व धाबे यांची तपासणी केली. यामध्ये ५ हॉटेलवर अवैधरीत्या महाविक्री आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. त्याचप्रमाणे एका गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री केंद्रावर छापा टाकून दोन गुन्हे नोंदविण्यात आले. अवैधरीत्या होणाऱ्या ताड़ी विक्री केंद्रावर छापा टाकून एक गुन्हा नोंदविण्यात आला. असे एकूण ०८ गुन्हे नोंद करून ०८ आरोपींना अटक करण्यात आली.
दरम्यान, सदर गुन्ह्यांमध्ये ३४०० लि. रसायन, ५१. लि. गावठी हातभट्टी दारू. १० लि. देशी दारू, २४ लि. विदेशी मद्य तसेच २७ लि. बियर असा एकूण दुमारे १ लाख १५ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.हि कारवाई पुणेराज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त ए. बी. चासकर, अधीक्षक सी. बी. राजपूत, उपअधीक्षक युवराज शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय सराफ, निरीक्षक समीर पाटील, दुय्यम निरीक्षक डी. बी. सुपे, एस.टी. भरणे, ए. एस. जाधव, एम. आर. राठोड, बी.एस. घुगे, अजय बडदे व जवान संवार्गीय कर्मचारी यांनी केली आहे.