Solapur Crime : सोलापूर : सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या संमतीने दोन लाखांच्या लाचेची मागणी करत एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी पोलीस उपनिरीक्षकाने दर्शवली होती. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
विक्रम राजपूत यांनी एका व्यक्तीवर दाखल केलेल्या गुन्ह्यात अनुकूल तपास करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी स्वतःसाठी आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावाने दोन लाख रूपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोड करुन एक लाख रूपयांची लाच स्वीकारण्यास संमती त्यांनी दर्शवली. याप्रकरणी फिर्याद नोंदवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विक्रम राजपूतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास विक्रम राजपूत करत होते. त्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी राजपूत यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित व्यक्तीच्या मित्राने केली होती. त्यानंतर एसीबीने 6 ऑक्टोबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली तेव्हा राजपूत यांनी एक लाख रुपयांची लाच स्विकारण्यास संमती दर्शवली होती. त्यानंतर एसीबीने राजपूत यांना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.