पुणे : खराडी-चंदननगर परिसरात बेकायदा सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापे टाकले आहेत. या कारवाईत पोलिसांनी २३ हजार ३७० रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर याप्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागात एका पत्राच्या खोलीत बेकायदा पणती पाकोळी, सोरेट जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी २३ हजार ३७० रुपयांची रोकड जप्त केली आहे.
दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी जुगार अड्डा चालविणारा, तसेच जुगार खेळणारे अशा १७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनयमान्वये गुन्हा दाखल केला. सर्व आरोपींना चंदननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हि कामगिरी अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे आणि मनीषा पुकाळे यांच्या पथकाने केली आहे.