Crime News : पुणे : पुण्यातील येरवडा खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने ब्लेडने स्वतःच्या डाव्या हातावर वार मारून, स्वतःलाच गंभीर जखमी करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. याप्रकरणी कैदी धनंजय राजाराम दिघे याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात कारागृह प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कैदी जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.(Crime News)
येरवडा पोलीस ठाण्यात कारागृह प्रशासनातर्फे गुन्हा दाखल.
याबाबत कारागृहाच्या वतीने निशा दिलीप कुमार श्रेयकर (वय ३२, रा. येरवडा, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्तणूक चांगली असल्याने कैदी धनंजय दिघे याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. दिघे याने कचऱ्यात पडलेल्या जुन्या ब्लेडने डाव्या हातावर वार केले. दिघे याच्या हातातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.(Crime News)
कैदी धनंजय दिघे हा सध्या येरवडा खुल्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याने कारागृहातील मुद्रणालयाच्या मागील बाजूस पाण्याच्या हौदाजवळ पडलेल्या एका खराब ब्लेडने स्वतःच्या डाव्या हातावर वार करत स्वत:ला गंभीर जखमी करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कैद्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. लिंगे करत आहेत.(Crime News)