पुणे : पोलिस शिपाई भरती परीक्षेच्या पेपर गेल्या वर्षी पुण्यात झाला. पुण्यातील शनिवार पेठेतील एच.व्ही.देसाई महाविद्यालयात ही परीक्षा झाली होती. या परीक्षेत एका विद्यार्थ्यांने कॉपी केल्याचा प्रकार एक वर्षांनंतर उघडकीस आला आहे. आकाश लांडे (रा. बीड) असे या मुलाचे नाव आहे.
राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१९ कुसडगाव जळगाव पोलिस शिपाई भरती परीक्षेत ब्ल्यूटूथ डिव्हाइसचा वापर करून कॉपी केल्याने लांडेवर पोलिसांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती गुरुवारी दिली आहे.
या प्रकरणी विशाल खंडाळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार १२ डिसेंबर २०२१ राेजी घडलेला आहे.आकाश लांडे हा मूळचा बीडचा रहिवासी असून पाेलिस शिपाई भरती परीक्षेच्या पेपरसाठी तो पुण्यातील शनिवार पेठेतील एच.व्ही.देसाई महाविद्यालयात आला होता.
त्या वेळी त्याने परीक्षेचा पेपर देताना ब्ल्यूटूथ डिव्हाइसद्वारे प्रश्नपत्रिका बाहेर मित्रांना पाठवून त्यांच्याकडून ब्ल्यूटूथच्या साहाय्याने प्रश्नांची उत्तरे सोडवून घेऊन परीक्षा पास होऊन अंतिम निवड यादीत निवड होऊन गैरमार्गाने शासनाची नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयातील निगडी ठाणे येथे याबाबत गुन्हा दाखल झाला होता.