मुंबई : विवाहित बहीण तिच्या दीराशी लग्न करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत आहे, मात्र आपलं आधीच लग्न झालं असल्याबाबत सांगूनही तिने जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे दिली आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये घडला आहे. एका बहिणीनं दुसऱ्या बहिणीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी तिनं पोलिसांत तक्रार दिली. ती मूळची कन्नौज जिल्ह्यातली रहिवासी आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर ती आणि तिची आई या दोघीच राहत होत्या. तेव्हा लग्न झालेल्या मोठ्या बहिणीनं त्यांना स्वतःकडे बोलावून घेतलं. तिथे आल्यानंतर मोठी बहीण धाकटीवर तिच्या दीराशी लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागली होती. तक्रारदार बहिणीने मात्र आपलं लग्न आधीच झाल्याचं म्हटलं आहे. कन्नौजमध्ये शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर आपलं प्रेम असून नातेवाईकांना न सांगताच त्यांनी लग्न केल्याचं तिनं म्हटलं आहे. पीडित तरुणीने सांगितलं, की तिला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आहे. तिच्या नवऱ्यानंही तिला परवानगी दिली आहे. तिचा नवराही आता नोएडाला आला असून ते दोघं एकत्रच राहतात; मात्र मोठ्या बहिणीचा तिच्या पुढे शिकण्याला विरोध आहे.
तरीही ती त्याच्याशी माझं लग्न..
‘मोठ्या बहिणीचा दीर मजुरी करतो. तरीही ती त्याच्याशी माझं लग्न लावून देण्याचा विचार करत होती. म्हणून अखेर मी माझ्या नवऱ्याला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मी माझा मोबाइल क्रमांकही बदलला, जेणेकरून बहीण मला फोन करू शकणार नाही; मात्र तिनं तो शोधून काढला आणि मला फोन करून त्रास देऊ लागली. आता तर तिनं जीवे मारण्याचीही धमकी दिली,’ असं धाकट्या बहिणीचं म्हणणं आहे.
आपलं लग्न झाल्याचं जेव्हा मोठ्या बहिणीला सांगितलं, तेव्हा हे लग्न तिला मान्य नसल्याचं तिनं सांगितलं, असं धाकट्या बहिणीचं म्हणणं आहे. बहिणीच्या घरात राहत असताना तिचा दीर सतत ‘आय लव्ह यू’ म्हणायचा. बहिणीला सांगितल्यावर तूही त्याला ‘आय लव्ह यू’ म्हण असं तिनं सांगितलं. मोठ्या बहिणीचं हे विचित्र बोलणं ऐकून अखेर धाकट्या बहिणीनं पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेतली असून, मोठ्या बहिणीची चौकशी केली जाईल असं म्हटलं आहे.