Yawat News यवत, (पुणे) : दौंड तालुक्यातील यवत येथील इंदिरानगर परिसरात हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातील एका कुटुंबाला जात पंचायतीने ४५३ रुपयाचा दंड ठोठावला असून एका आख्या कुटुंबालाच समाजातून वाळीत (बहिष्कृत) टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Yawat News) याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Yawat News)
यवत पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल
जात पंचायतीचे प्रमुख पंच मोहन भगवान चव्हाण (मु. पो. आरोळी वस्ती, जामखेड, ता. जामखेड जि. अहमदनगर) व नारायण अर्जुन सांवत (रा. ब्राम्हणी, ता. राहुरी जि. अहमदनगर), भगवान शंकर चव्हाण, भाऊराव सिताराम शिंदे, रणजित मोहन चव्हाण (सर्व रा. आरोळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड जि. अहमदनगर), तानाजी अर्जुन सांवत, नाथा अर्जुन सांवत, नामदेव अर्जुन सांवत (सर्व रा. ब्राम्हणी, ता. राहुरी जि. अहमदनगर), गंगाराम रावजी चव्हाण (रा. हांडी निमगाव ता. नेवासा जि. अहमदनगर) या नऊ पंचांवर सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शोभाबाई राजाराम शिंदे (वय-५५, रा. इंदिरानगर, यवत , ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभाबाई शिंदे या हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मोलमजुरी करणाऱ्या महिलेने त्यांच्या समाजातील दोघांना दोन मुलीचे लग्न जमविण्यासाठी ८० हजार रूपये परत मागितले, या कारणावरून २ जुलै रोजी जात पंचायत बोलावली. या जातपंचायतीत या महिलेला दोषी ठरवत ४५३ रुपयाचा दंडाची शिक्षा सुनवत बेकायदेशीर रित्या संपुर्ण कुटुंबाला समाजातून वाळीत टाकले.
दरम्यान, सदर घटनेबाबत शोभाबाई शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात ९ जणांच्या विरुध्द फिर्याद दिली आहे. प्रमुख पंचांसह एकूण नऊ जणांवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लोखंडे हे करीत आहेत.