पुणे : मतदान साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या शिक्षकाचा टेम्पोच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धानेप (ता. वेल्हे) येथे घडली आहे.
सागर नामदेव देशमुख (वय ३३, मूळगाव वारगुंसी, ता. अकोले, जि. नगर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वेल्हे तालुक्यातील कंधारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत होते.
वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यासह तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी आज (ता. १८ डिसेंबर) सर्वत्र मतदान होणार आहे. यासाठी सागर देशमुख यांची वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान अधिकारी क्रमांक तीन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
देशमुख हे त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकीने मतदान साहित्य वाटप केंद्रावर येत होते. यावेळी धानेप गावच्या हद्दीत देशमुख यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. त्यांना उपचारासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
दरम्यान, देशमुख यांचा तीन वर्ष शिक्षण सेवकाचा कार्यकाल संपल्याने सेवा नियमित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी होता. अतिशय प्रामाणिक, कार्यतत्पर अशा शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने पूर्ण शिक्षण विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत वेल्हे पोलिस ठाण्यात संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.