पुणे : येरवडा परिसरात शिवशाही बसने पेट घेतल्याचा प्रकार मंगळवारी (१ नोव्हेंबर) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. एमएच ०६ डीडब्लू ०३१७ ही शिवशाही बस यवतमाळ ते पुणे असा प्रवास करत होती. मंगळवारी सकाळी बस येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटलच्या शेजारी आली असता बसने अचानक पेट घेतला.
येरवडा येथून ही शिवशाही बस शिवाजी नगर बस डेपो येथे निघाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. अग्निशमन दलाने काही मिनिटातच आगीवार नियंत्रण मिळवत, कुलिंगच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती माहिती अधिकारी निलेश महाजन यांनी दिली.
ही शिवशाही बस यवतमाळ येथून निघाल्यानंतर वारंवार गरम (ओव्हरहीट) होत असल्याने तिला पाणी टाकून पुण्याच्या दिशेने आणण्यात येत होते. सर्व प्रवासी खराडी येथे उतरल्यानंतर शास्त्रीनगर येथे बस आली असता तिने अचानक पेट घेतला. बस मध्ये कोणीही प्रवासी नसल्याने मोठी हानी टळली. यावेळी बस चालक आणि वाहक यांनी तात्काळ आपली सुटका करून घेत गाडीचे बाहेर पडल्याचे गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे यांनी सांगितले.