पुणे : शिवशाही बस पेटल्याची घटना पुण्यात ताजी असताना आज पुन्हा नाशिकमध्ये भररस्त्यातच शिवशाही बसने पेट घेतला. बसचालकाच्या तत्परतेने प्रवाशांचे प्राण वाचले. प्रवासी सुखरूप खाली उतरल्यानंतर त्यांना तातडीने रस्त्याच्या बाजूला सुरक्षित स्थळी उभे करण्यात आले.
बसने पेट घेतल्याने आगीचे आणि धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. आगीमुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. बसचालकाने तातडीने बस उभी करत वाहक आणि प्रवाशांना सावध करत लागलीच बसमधून खाली उतरण्याचे फर्मान सोडले.
पिंपरी चिंचवड आगाराची शिवशाही बस ही नाशिक सीबीएस येथून सकाळी 7 वाजेच्या सुमारास पुणे (शिवाजीनगर) कडे जाण्यासाठी निघाली होती. सिन्नरच्या माळवाडी शिवारात ही बस आल्यानंतर बसची गती आपोआप मंदावल्याचे चालक अमीत वासुदेव खेडेकर (वय ४१) यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हळूहळू बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका कारचालकानेही पाठीमागून बस पेटल्याचे बस चालकाला सांगितले.
बसमध्ये बसवण्यात आलेल्या फायर फायटरचे बटन दाबून ते ॲक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र या फायर फायटरचे बटन ऑपरेट न झाल्याने चालकाचा नाईलाज झाला. त्यानंतर एकेक करत प्रवासी तातडीने ५ मिनिटात खाली उतरले. तोपर्यंत बसने जोराचा पेट घेतला होता.
मंगळवारी देखील पुण्यात शिवशाही बसने अचानक पेट घेतला होता. तेव्हादेखील चालकाच्या प्रसंगावधामुळे बसमधील सर्व 42 प्रवासी बालंबाल बचावले होते. कालच्या बसचे इंजिन सातत्याने गरम होत होते. त्यामुळे यवतमाळमधून बस सावकाश पुण्याच्या दिशेने आणण्यात येत होती. परंतु पुण्यातील येरवडामध्ये आल्यावर बसने पेट घेतला. आजदेखील इंजिन गरम झाल्यामुळे तर ही दुर्घटना झाली नाही ना?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.