Shirur Crime News : शिरूर : अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरुर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला बुधवारी रंगेहाथ पकडले. राजेंद्र दगडू गवारे (वय ५३, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शिरुर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ६५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गवारे हे करत होते. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या मुलास अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी गवारे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर तहसीलदार कचेरी कार्यालयात सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून मित्रधन चहाची टपरीमध्ये १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी गवारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष रंगेहाथ पकडले.
दरम्यान, याप्रकरणी गवारे यांच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून, पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करत आहेत.