कवठे येमाई : कवठे येमाई (ता.शिरुर) येथील इनाम वस्तीनजीक खार ओढ्यात एक तरुण पाय घसरून पडला होता. याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा शोध घेतला जात होता. अखेर दोन दिवसांनी मंगळवारी (दि.२६) स्थानिक ग्रामस्थांना त्याचा मृतदेह सापडला.
राजेंद्र विक्रम कोळी (वय २५, रा. मालखेडा, ता मुक्ताईनगर जि. जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. तो कवठे येमाई येथील इनाम वस्ती परिसरातील खार ओढ्यात पाय घसरून पडला होता. रविवारी (दि. २४) ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व पुणे प्राधिकरणाच्या अग्निशामक विभागाच्या बचाव पथकाने दिवसभर अथक प्रयत्न करून देखील तो मिळून आला नव्हता.
पाण्याची पातळी सोमवारी (दि.२५) जास्त असल्याने मदत कार्यात अडचणी आल्या होत्या. मात्र, मंगळवारी (दि.२६) सकाळी दहाच्या सुमारास पोलीस पाटील गणेश पवार हे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले असता पाण्याची पातळी खाली गेल्याने त्यांना या तरुणाचा मृतदेह एका खडकाजवळ आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती शिरूर पोलीस ठाण्याला दिली. मुळशी आपत्ती व्यवस्थापनच्या शोध मोहीम पथकाने मृतदेह बाहेर काढला.
शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनोद शिंदे, विष्णू दहिफळे यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शिरूर येथे पाठविला. या मदतकार्यात निवासी गायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी, मंडलाधिकारी माधुरी बागले, तलाठी ललिता वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, पोलीस नाईक उमेश भगत विष्णू दहिफळे, दीपक पवार, पोलीस पाटील गणेश पवार, तसेच माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, उपसरपंच उत्तम जाधव, सामाजिक कार्यकर्ते किसन हिलाळ, पांडुरंग भोर, अविनाश पोकळे, बाबाजी वागदरे, बाबू खाडे यांनी विशेष मेहनत घेतली.