Shirur News शिरूर : मोटर सायकलींची चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल ४ लाख रुपये किंमतीच्या सात मोटार सायकली जप्त केल्या आहेत. (Shirur News)
वैभव राजेंद्र बोरूडे (वय २६), ऋषिकेश राजेंद्र पवार (वय २३, दोघे रा. पाथर्डी ता. पाथर्डी जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहे.
पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही काळात झालेल्या मोटार सायकल चोरी होत होत्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी वेगवेगळी पथके तयार केली होती.
तपास पथकातील पोलिस अंमलदार शेखर झाडबुके शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, शिरूर शहरामध्ये दोन जण संशयितरीत्या मोटार सायकल वरती फिरत आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखविताच, आरोपींनी ताब्यातील मोटर सायकल हि अहमदनगर येथून चोरी केली असल्याची पोलिसांना कबुली दिली. तसेच शिरूर शहरातुन सुध्दा गेल्या ६ ते ७ दिवसापूर्वी एक मोटर सायकल चोरी केली आहे. असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून ७ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. त्यामध्ये ०२ बुलेट, १ पॅशन प्रो, ०१ सुपर स्लेंडर, ०३ स्प्लेंडर अशा मोटार सायकल किमंत अंदाजे ४,०१,००० किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस नाईक निलेश शिंदे करत आहेत.
हि कामगिरी शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एकनाथ पाटील, पो. ना. नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, निलेश शिंदे, पो. अ. विनोद काळे, रघुनाथ हाळनोर, शेखर झाडबुके, नितेश थोरात, सचिन भोई व पवन तायडे यांच्या पथकाने केली आहे.