शुभम वाकचौरे
जांबूत, (पुणे) : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेट भागामध्ये लागोपाठ डीपी (रोहीत्र) चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी लाईट ही आवश्यक गोष्ट असल्याने त्याच लाईटसाठी असलेली डीपीची (रोहीत्र) चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यात आता शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत बेट भागातील डीपी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली.
बेट भागातील डीपी चोरी प्रकरणामुळे समाज माध्यमामधून पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. त्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी शिरूर पोलीस ठाण्यातील तीन वेगवेगळे पथके तयार करून त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये सातत्य ठेवून पोलीस पथकासह गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली. त्याचप्रमाणे रोहीत्र चोरी करणाऱ्या टोळीच्या सतत मागावर राहून वेगवेगळ्या ठिकाणावरून त्यांना ताब्यात घेतले आहे.
यामध्ये बाळशीराम तुकाराम सुर्यवंशी (वय ५५, रा. बोरी शिरवली तालुका जुन्नर जिल्हा पुणे, मूळ रा. पारगाव), मीना घोड संगम (तालुका आंबेगाव, पुणे), लघु बबन करंडे (वय ३० वर्षे राहणार काठापुर बु तालुका आंबेगाव जिल्हा पुणे), रविंद्र राघु सुकरे (वय ३४ वर्षे राहणार काठापुर बु तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यांच्याकडून असे एकुण १३ रोहीत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
या आरोपीत यांचे मदतीने रोहीत्र मधील तांब्याच्या तारा विकत घेणारे आफताफ लालसा शेख (वय ४१, रा. मालवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक) व शिवकुमार शिंदेसरीकुमार चौहान (वय २८, रा. पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेउन त्यांच्याकडुन ३३० किलो वजनाची तांब्याच्या कॉईल व पट्ट्या असा एकुण २ लाख ३१ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला. यातील आरोपीत रामदास जाधव (रा. काठापुर खु तालुका शिरूर जिल्हा पुणे) हा फरार असुन, त्याचा शोध सुरू आहे. शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत.