अक्षय भोरडे
Shirur News तळेगाव ढमढेरे : कोंढापुरी (ता.शिरुर) येथील जोशी फार्मच्या शेजारील एका घरात चोरट्यांनी दरोडा टाकला. घरात शिरलेल्या सहा चोरट्यांनी महिलांना शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केली. (Shirur News) तसेच त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व पैसे घेऊन पोबारा केला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात सहा चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Shirur News)
सहा अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
कोंढापुरी (ता. शिरुर) येथील जोशी फार्मच्या शेजारी राहणारे राजू कदम यांचे कुटुंबीय रात्रीच्या सुमारास घरात झोपलेले असताना सहा अज्ञात चोरट्यांनी दरवाजा कटावणीने उचकटून घरात प्रवेश केला. दरम्यान चोरट्यांनी राजू यांच्यासह त्यांची पत्नी रेवतीबाई यांना शस्त्राचा धाक दाखवत काठीने मारहाण केली.
तसेच रेवतीबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील झुमके आणि राजू यांच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले. याशिवाय, शेजारील खोलीत झोपलेल्या राजू यांच्या सासूच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. कपाट उघडून कपाटातील साठ हजार रुपये रक्कमही काढून घेतली.
यावेळी चोरट्यांनी घरातील तिघांना मारहाण करुन घरातून पोबारा केला. याप्रकरणी राजू विश्वनाथ कदम (वय ५१ वर्षे रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सहा अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.