पुणे : रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन तरुणांना शिक्रापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार, कोयता, चाकू, मिरची पूड जप्त करण्यात आली आहे.
विकी उर्फ विवेक उर्फ दाद्या राजेश खराडे (वय.१९ ), आदित्य नितीन भोईनल्लू (वय. २०), आदीन जैनोद्दीन शेख (वय १९.) ( तिघे रा. शिरूर ता. शिरूर जि .पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तसेच दोन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई निखिल भिमाजी रावडे (रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पथक मंगळवारी (ता.२१ ) रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना तळेगाव न्हावरा रोड येथे काही तरुण संशयितपणे दबा धरुन बसल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तळेगाव न्हावरा रोड तेथील राहुल करपे यांच्या प्लॉटिंगमध्ये पाच तरुण बसल्याचे दिसले. त्यानंतर पोलीस आल्याची चाहूल लागतात सर्व आरोपी तरुण पळून जाऊ लागले असता, पोलिसांनी पाठलाग करत तीन तरुणांना जागेवर पकडले.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, तलवार, कोयता, बॅटरी, मिरची पूड, दोरी असे साहित्य मिळून आले. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून त्यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.