पुणे : शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेला सिग्नलचा रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना कोथरूड येथील गांधी भवन चौकाजवळ रविवारी (ता.२६) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कोथरूड कोथरूड पोलिस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री प्रदिप करंजीकर (वय ६४, रा. डहाणुकर कॉलनी,कोथरुड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर भावेश नंदलाल आहिरे (वय २८, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री करंजीकर या डहाणुकर कॉलनीत रहातात. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्या शतपावली करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. कर्वे रोडवरील डहाणुकर कॉलनीकडे जाणार्या सिग्नलजवळ त्या रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या मोटारसायकलचालकाने त्यांना धडक दिली.
दरम्यान, या अपघातात जयश्री करंजीकर या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी करंजीकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी भावेश आहिरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करीत आहेत.