बारामती : बारामती येथे बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दापाश करण्यासाठी बारामती उपविभागीय पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने बारामतीतील एमआयडीसीतील आरटीओ कार्यालयाजवळील असलेल्या हॉटेल राजलक्ष्मी येथील लॉजिंगवर शनिवारी (ता.१०) छापा टाकून दोन परप्रांतीय महिलांची सुटका केली आहे. तर व्यवस्थापकाला अटक करून तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
किरण बापू पाटील असे अटक करण्यात आलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव आहे. तर व्यवस्थापकासह युवराज लोखंडे व विठ्ठल चव्हाण यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश शिवदास काटकर यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथील राजलक्ष्मी हॉटेल, परमीट रुम, बार व लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीचा खातीरजमा करण्यासाठी पोलिसांचे पथक बनावट ग्राहकासोबत कारवाई करण्यासाठी सदर ठिकाणी गेले होते.
त्यानंतर बनावट ग्राहकाने रूम बुक केली. त्यावेळी त्यांचा नंबर घेण्यात आला. ग्राहकाने लॉजिंगवर जात वेश्यागमनासाठी महिलेची मागणी केली. १२०० रुपये दर त्याला सांगण्यात आला. त्यानुसार त्याने पैसे देत असताना लगेचच पथकाला इशारा केला. पोलिसांनी लॉजिंगची झडती घेतली असता, त्यांना एका खोलीमध्ये दोन महिला आढळून आल्या. त्यातील एक महिला ओडिसा तर दुसरी आसाम राज्यातील आहेत. पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली.
दरम्यान, पथकाने येथे छापा टाकला असता व्यवस्थापक किरण पाटील याला ताब्यात घेतले. पाटील यांच्याकडील चौकशीत युवराज लोखंडे व विठ्ठल चव्हाण यांच्या सांगण्यावरून हा व्यवसाय येथे केला जात आहे. असे पाटील याने सांगितले आहे.