लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर अल्पवयीन मुलगा चालवत असलेली दुचाकी इंडीकावर आदळुन झालेल्या अपघातात, दुचाकीवरील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.
लोणी काळभोर हद्दीतील एमआयटी कॉर्नरवर झालेल्या अपघातात अथर्व तुषार साळुंखे (वय- 17, रा. कदमवाकवस्ती (पठारेवस्ती) ता. हवेली) हा अल्पवयीन मुलगा गंभीररित्या जखमी झाला असुन, त्याच्यावर कदमवाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार चालु आहेत. या अपघातामुळे आपल्या लाडक्या अल्पवयीन मुलां-मलींना वाहन चालवण्यास देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व साळुंखे हा लोणी स्टेशनहुन माळीमळा बाजुकडे दुचाकीवरुन भऱधाव वेगात निघाला होता. अथर्व एमआयटी कॉर्नरवर आला असता, त्याचवेळी एक इंडीका एमआयटीकडुन पुणे-सोलापुर मार्गावर येत होता. तर दुसरीकडे एक लाल रंगाचे चारचाकी वाहन उरुळी कांचनकडे जात होते. अथर्वला एंडीका वर येत असल्याचे दिसले मात्र त्याचवेळी लाल रंगाच्या वहानाने अथर्वला हुलकावणी दिल्याने, अथर्व इंडीकावर जाऊन आदळला. यात इंडीकावरुन उडुन तो रस्त्याच्या दुभाजाकवरही जाऊन आदळला. यात त्याला मोठा मार लागल्याने, त्याची अवस्था अतिशय गंभीर आहे. त्याच्यावर विश्वराज हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार चालु आहेत.
दरम्यान पुणे-सोलापुर महामार्गावर वाहतूक नियम मोडणाऱ्यांमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी वेगाने वाहने चालवताना दिसत असून यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढू लागले आहे. अशा अल्पवयीन वाहनचालकांवर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने विशेष नजर ठेवण्याची गरज आहे. मात्र पोलिसांचे लक्ष वसुलीकडे जादा असल्याने, लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या तीनही गावात अल्पवयीन मुले सर्रास महातुक नियमांचे भंग करुन वहाने चालवत आहेत. विशेष बाब म्हणजे पालकही मोठ्या हौशेने अल्पवयीन मुलांना वहाने देत असल्याचे दिसुन येत आहे. वहातुक पोलिसांनी विशेष मोहीम राबवुन, मुलांनी वाहतुकीचे नियम मोडल्यास मुलांना वाहन चालविण्यास देणारे वाहनमालक किंवा पालकांवर कारवाई करण्याची गरज आहे.