पुणे : न्हावरा (ता शिरूर) येथील विवाहितेला शाररीक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती आणि दिराला सात वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आज शुक्रवारी (ता.३०) ठोठाविली आहे. हा आदेश शिवाजीनगर येथील नांदेडकर यांच्या सेशन कोर्टाने दिले आहेत.
विकास काळु पवार (वय 30) आणि प्रकाश काळु पवार (वय 33 रा न्हावरा ता शिरूर जि पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बाळासाहेब गुंजाळ यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी रेश्मा उर्फ रेणुका आणि आरोपी विकास यांचा रितीरिवाजाप्रमाणे फेब्रुवारी २०१६ ला विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर आरोपींनी गाडी व नवीन व्यावसाय करण्यासाठी रेश्माला २ लाख रुपयांची हुंड्याची मागणी केली. तसेच आरोपी जावई विकास याचे अनैतिक संबंध होते. हे मुलगी रेश्माला माहिती झाले होते.
त्यानंतर आरोपींनी रेश्माला वारंवार शाररीक व मानसिक छळ केला. या होणाऱ्या छळाला कंटाळून रेश्माने आत्महत्या केली. याप्रकरणी रेश्माचे वडील बाळासाहेब गुंजाळ यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांनतर शिरूर पोलीसांनी आरोपींना अटक केली होती. त्यानंतर त्यांचा खटला शिवाजीनगर येथील नांदेडकर यांच्या न्यायालयात सुरु होता.
सरकारी पक्षातर्फे करण्यात आलेले युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी विकास पवार याला दोन वर्षाची तर आरोपी प्रकाश पवार याला सात वर्षाची शिक्षा ठोठावण्याचे आदेश दिली आहेत.
दरम्यान, या खटल्यात सरकारी पक्षातर्फे औरंगाबादकर व जावेद खान यांनी कामकाज पहिले. तर त्यांना शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, भजनावळे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत ,कोर्ट पैरवी कर्मचारी रेणुका भिसे,एस बी रणसर यांची मदत मिळाली.