Selfi : चंद्रपूर : सेल्फी काढण्याच्या नादात तलावात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची दृदयद्रावक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी सिंचन तलाव परिसरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाचवेळी चौघा मित्रांना जलसमाधी मिळाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनीष श्रीरामे (वय – २६), धीरज झाडें (वय २७), संकेत मोडक (वय – २५) आणि चेतन मांदाडे (वय-१७) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या चारही तरुणांचे मृतदेह तलाबाहेर काढण्यात आले आहेत. या चारही तरुणांचे मृतदेह तलाबाहेर काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्यातील शेगाव येथील ८ युवक घोडाझरी सिंचन तलाव परिसरात वर्षा सहलीसाठी आले होते. यातील एक युवक तलाव परिसरात सेल्फी काढत होता. सेल्फी काढण्याच्या नादात तो तलावात घसरला. मित्राला तलावात पडल्याचे पाहून या तिघा मित्रांनी देखील तलावात उडी घेतली. मित्राला वाचविण्याच्या नादात पाण्यात उतरलेल्या अन्य ३ युवकांना देखील जलसमाधी मिळाली.
दरम्यान स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मासेमारांच्या मदतीने शोधकार्य राबवण्यात आले. यानंतर या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या मान्सून सुरु झाल्यामुळे वर्षा सहलींचे आयोजन केले जाते. समुद्र किनारे, तलाव तसेच धबधब्यांवर पर्टकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, असा ठिकाणी सेल्फी घेताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.