पुणे : शालेय विद्यार्थ्यावर ब्लेडने वार करुन बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना पर्वतीदर्शन येथील ना. सी. फडके चौकात नुकतीच घडली आहे.
याप्रकरणी शाळकरी मुलाच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ६ जणांच्या विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा वर्षीय शाळकरी मुलगा सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. मुलगा शाळेतून घरी निघाला होता. त्या वेळी सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौकात आरोपींनी त्याला अडवले. आरोपींनी शिवीगाळ करुन मुलाच्या डोक्यात गज मारला. त्यानंतर त्याला धमकावून दुचाकीवरुन पर्वती दर्शन भागात नेले. त्याच्या हातावर ब्लेडने वार करण्यात आले. शाळकरी मुलाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
दरम्यान, आरोपी हे शाळकरी मुलाच्या ओळखीचे आहेत. परंतु, मुलगा गंभीर जखमी असल्याने नावे समजू शकली नाहीत. मात्र याप्रकरणी मुलाच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरी, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुरी करीत आहेत.