जीवन सोनावणे
खंडाळा, (सातारा) : शिरवळ ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी यांना माहिती अधिकाराअंतर्गत माहिती न दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी २५ हजार रुपयांचा दंड मासिक वेतनातून वसुल करण्याचे आदेश दिले आहेत.
बबनराव धायगुडे असे दंड ठोठावण्यात आलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. धायगुडे हे शिरवळ (ता. खंडाळा) येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते इम्रान उर्फ पप्पू कलाम काझी यांनी शिरवळ येथील ग्रामपंचायतचे जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी म्हणून बबनराव धायगुडे यांच्याकडे लेखी स्वरुपात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. मात्र संबंधित माहिती बबनराव धायगुडे यांनी न दिल्याने इम्रान उर्फ पप्पू काझी यांनी खंडाळा पंचायत समितीचे प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते.
यावेळी संबंधितांनी आदेश देऊनही ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांनी माहिती न दिल्याने तक्रारदार यांनी पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांच्याकडे २० डिसेंबर २०२२ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. यावेळी सुनावणी होत राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी तक्रारदार इम्रान उर्फ पप्पू काझी यांनी दाखल केलेला तक्रारी अर्ज मान्य केला.
दरम्यान, शिरवळ ग्रामपंचायत जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांना माहिती न दिल्याप्रकरणी २५ हजार रुपयांचा दंड भरण्याचा आदेश सुनावत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांना संबंधित २५ हजार रुपयांचा दंड मासिक वेतनातून वसुल करण्याचा आदेश दिला आहे.