सासवड, (पुणे) : मोटारसायकल स्लिप झाल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत भीषण हाणामारी झाली. कोयता, लोखंडी गज आणि बॅटने झालेल्या या हल्ल्यात दोन्ही बाजूचे तरुण जखमी झाले असून, सासवड पोलिसांनी 8 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. सासवड (ता. पुरंदर) येथील खंडोबानगर परिसरात सोमवारी (ता. 20) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

या हाणामारीत कोयता, बॅट, लोखंडी गज आणि दगडांचा मुक्तवापर करण्यात आला असून, दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. सासवड पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या घटनेत फिर्यादी किरण उर्फ मंगेश प्रताप सोळंकी (वय-27) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या मित्रांसह रस्त्याच्या कडेला असलेल्या कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. यावेळी अक्षय उर्फ गोट्या खेनट हा मोटारसायकलवरून जात असताना स्लिप होऊन पडला. “तुमच्यामुळेच मी पडलो” असे म्हणत त्याने शिवीगाळ केली आणि काही वेळातच आपल्या मित्रांना घेऊन आला. सुरज उर्फ गोट्या जाधव, सेवक जाधव, अक्षय खेनट व एक अनोळखी यांनी खोऱ्याची दांडी, बॅट आणि कोयता घेऊन हल्ला केला. गोट्या जाधव याने किरणचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तर इतरांनी बॅट आणि स्टंपने मित्रांना मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या घटनेत सुरज नंदकुमार जाधव (वय-25) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मित्र सचिन उबाळेसोबत मोटारसायकलवरून जात असताना किरण सोळंकी याच्या भावाने त्यांची गाडी आडवी मारली. यावेळी त्या ठिकाणी किरण उर्फ मंगेश सोळंकी, राजू निघोल, दादा खोमणे आणि किरणचा लहान भाऊ याठिकाणी आले. यावेळी किरण सोळंकी याने सुरजच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला आणि तो खाली पडल्यावर त्याचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दादा खोमणे याने सचिन उबाळे याच्या डोक्यात दगड मारून गजाने पाठीवर वार केले.
दरम्यान, सासवड पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिताकलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार लडकत व पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.





