पुणे : मृत्युचे प्रमाणपत्र देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुसगाव खुर्द (ता. मावळ) येथील सरपंच व ग्रामसेवक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
अनिल बाळू येवले (वय – ३३, सरपंच, कुसगाव खुर्द, ता. मावळ, जि. पुणे) आणि अमोल बाळासाहेब थोरात (वय ३४ , ग्रामसेवक, कुसगाव खुर्द ग्रामपंचायत, ता. मावळ, जि. पुणे) असे रंगेहाथ पकडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीसाठी, तक्रारदार यांचे चुलत आजी आजोबा यांचे मृत्युचे प्रमाणपत्र मिळण्याकरीता कुसगांव खुर्द ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. त्यांच्या मृत्यु प्रमाणपत्रासाठी केलेला मागणी अर्ज व हरकती अर्ज यांच्या प्रती मिळण्याकरीता तक्रारदार यांनी २६सप्टेंबर २०२२ रोजी अर्ज दिला होता. ग्रामपंचायतीचे सरपंच येवले यांनी दाखले देण्याकरीता १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच येवले यानी दाखले देण्याकरीता १० हजार रूपयाची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रूपये लाच रक्कम स्वीकारली. सरपंच येवले यानी केलेल्या लाच मागणीस लोकसेवक थोरात (ग्रामसेवक) यानी प्रोत्साहन दिले. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरी, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सीमा आडनाईक करीत आहेत.