Sangli News : सांगली : सांगली शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची घरासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. बुलेट गाडीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी एकामागून एक आठ गोळ्या झाडून आणि धारधार शस्त्रांनी वार करून ही हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेमुळे संपूर्ण सांगली परिसर हादरून गेला आहे.
हत्येचे कारण अस्पष्ट
नालसाब मुल्ला असे हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र नालसाब मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. (Sangli News) मात्र गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या शंभर फुटी नजीकच्या घराबाहेर निवांत बसले होते.
यावेळी चार अज्ञात इसम त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी मुल्ला यांच्याशी बाचाबाची सुरू केली. त्यामुळे मुल्ला यांनीही या अज्ञातांना झापण्यास सुरुवात केली. त्यावेळी या अज्ञातांनी मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक आठ राऊंड फायर केले. तसेच धारदार शस्त्राने डोक्यावर वार केले.(Sangli News) त्यामुळे मुल्ला हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे मुल्ला यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
नालसाब मुल्ला यांचा “बाबा” नावाने ग्रुप आहे. ज्याच्या माध्यमातून नालसाब मुल्ला यांची कारकीर्द सुरू झाली होती. बाबा ग्रुपच्या माध्यमातून त्यांची काही वर्षांपूर्वी सांगली शहरात दहशत होती. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले होते. भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांचे ते कट्टर कार्यकर्ते होते.(Sangli News) त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सक्रिय होते. बांधकाम मटेरिअल विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता.
मुल्ला यांच्या घराबाहेर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर ही हत्या का करण्यात आली, व या मागे कोण सूत्रधार आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने सांगली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.