Rural Police News : उरुळी कांचन, (पुणे) : भोर विभागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस असल्याची खोटी बतावणी करत नागरिकांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम लुबाडनाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन
जाफर हुसेन इराणी (रा. सध्या कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पुणे शहर ०९, अहमदनगर ०१, नवी मुंबई ०१. मुंबई शहर ०१, कर्नाटक राज्यात १८ असे एकूण ३० गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस असल्याची बतावणी करत नागरीकांची फसवणुक करून त्यांचेकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरी करत असल्याचे गुन्हे भोर विभागात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, भोर विभागात पोलीस बतावणी करून गुन्हा करणारी आंतरराज्यीय टोळी असून त्याचा म्होरक्या जाफर इराणी हा असून तो कर्नाटक राज्यातील साथीदारासह गुन्हा करत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने तपास पथकाने जाफर इराणी यास कोंढवा परीसरातून ताब्यात घेतले.
त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सादीक रफिक इराणी (रा. कोंढवा पुणे मुळ रा. गुंडलिक, कर्नाटक) याचे मदतीने राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध दाखल गुन्हे केल्याचे सांगितले. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत. दरम्यान, जाफर इराणी याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने भुईंज (सातारा) तसेच गोवा राज्यातील पोरवोरिम येथे दाखल असलेला गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी जाफर इराणी हा गुन्हे करताना वेगवेगळया साथीदारांना सोबत घेवून गुन्हे करतो. सदर आरोपीवर पुणे शहरात मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करणेत आलेली असून त्याचेवर वरीलप्रमाणे एकूण ३० गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हे पद्धतीचा वापर करून गुन्हा घडला असल्यास नागरीकांनी जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलीसांकडून करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, प्रदीप चौधरी, पोलीस हवालदार राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, पोलीस नाईक अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, मंगेश यांनी केली आहे.