लोणी काळभोर, (पुणे) : बांधकाम ठेकेदाराचे बंदुकीच्या धाकाने मारहाण व अपहरण करून एक लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी कोरेगाव भिमा (ता. हवेली) येथून आवळल्या आहेत.
अंकुर महादेव पाबळे, (वय- २६), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली श्रीकांत पाबळे (वय- २५, दोघेहि रा. कावळ पिंपरी ता. शिरूर), विशाल ऊर्फ आण्णा शिवाजी माकर, (वय २३, रा. ढोकसांगवी ता. शिरूर) दिलीप रामा आटोळे (वय ४५, रा. जांबुत दुडेवस्ती ता. शिरूर) निलेश बबन पळसकर, (वय ३५, रा. जांबुत ता. शिरूर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपी हे मध्यप्रदेश या ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांना त्यांना पकडले असून तपासादरम्यान त्यांच्याकडून पाच गावटी पिस्टल व नऊ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘निरगुडसर येथील लियाकत मंडल यांचा मजुरीवर बांधकामे करून देण्याचा व्यवसाय आहे. सध्या जांबूत परिसरात ते काही बांधकामे करीत होते. २ सप्टेंबरला सायंकाळी ते आपल्या दुचाकीवरून पिंपरखेड-काठापूर मार्गे निरगुडसरच्या दिशेने जात असताना, एका विना क्रमांकाच्या मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांना अडविले व बंदुकीचा धाक दाखवून मोटारीत बसविले.
फाकटे गावातील एका निर्जन परिसरातील घराजवळ नेऊन लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या दुचाकीची चावी, मोबाईल काढून घेत त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली व न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मंडल यांनी पत्नीशी संपर्क साधून मुलाकरवी एक लाख रुपये मागवून घेतले. ते अपहरणकर्त्यांना दिले.
त्यावेळी अपहरणकर्त्यांनी मंडल यांच्या मुलालाही पिस्तुलाचा धाक दाखवून कुणाला सांगितल्यास गोळ्या घालू अशी धमकी दिली. उर्वरित रक्कम दोन लाख रुपये हप्त्याप्रमाणे जमा केली नाही तर जीवे मारू, अशी धमकी देत त्यांनी मंडल बापलेकाला सोडून दिले. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असताना सदर घटनेतील आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. आरोपींचा ठावठिकाणा लागू नये म्हणून आरोपी हे वेगवेगळया जिल्हयात जावून ठिकाणे बदलून राहत होते. आरोपींची सखोल माहिती काढून गुन्हयातील मुख्य तीन आरोपी हे कोरेगाव भिमा या परीसरात येणार असून ते मध्यप्रदेश राज्यात पळून जाण्याचे तयारीत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली तसेच दिलीप आटोळे हा वाळू व्यावसायिक आहे. आरोपींचे ताब्यातून पाच गावठी पिस्टल, नऊ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. तसेच ३ हजार ४०० रूपये व फिर्यादीचे काढून घेतलेले आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, दुचाकीची चावी, लाकडी दांडके हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच आरोपींना शनिवारी (ता. २१) पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस हवालदार तुषार पंदारे, राजू मोमीण, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकात जाधव, मंगेश थिगळे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, हेमंत बिरोळे, पोना धिरज जाधव, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खड़के, शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सफी जी.एन. देशमाने, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, पोलीस नाईक बाळू भवर, एन. जगताप, पोना व्ही मोरे, एन. थोरात, ए. भालसिंग, आर. हाळनोर, पी. देशमुख यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.