पुणे, ता.१४ : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयातून एका सात महिने गरोदर महिलेचे अपहरण करून नरबळीसाठी नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही नरबळी आज शनिवारी (ता.१४) सर्वपित्री अमावास्येला देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी सदर महिलेचा काही बंगाली जादूटोना करणार्या व्यक्तींशी संपर्क आला. सदर महिलेला पहिल्या दोन मुली असून, ती आता तिसर्यांदा गरोदर आहे. यावेळी तरी मुलगा व्हावा, या उद्देशाने काहींच्या सांगण्यावरून ही महिला जादूटोना करणारांना भेटली. त्यावेळी या व्यक्तींनी पोटात असलेले बाळही मुलगीच आहे. असे ठामपणे सांगितले. त्याचबरोबर आपण जादूटोणाच्या मदतीने सदर मुलीचे गर्भातच मुलामध्ये रूपांतरण करण्याचा विश्वासही या व्यक्तींनी सदर महिलेला दिला.
मुलाच्या अपेक्षेने ही महिलाही या बंगाली जादूटोणा करणारांकडे आकर्षित होऊ लागली. एकेदिवशी तिने सारा प्रकार आपल्या पतीच्या कानावर घातला. त्यावेळी पतीने हे ‘सर्व थोटांड आहे. त्यावर विश्वास ठेऊ नको, तसेच पुन्हा या बंगाली लोकांकडे जाऊ नको’, असा स्पष्ट सल्ला दिला. ही गोष्ट बंगाली लोकांना समजल्यानंतर त्यांनी पती घरी नसताना महिलेची भेट घेऊन तिला पुन्हा गळी पाडले. हळूहळू या महिलेवर संमोहनाचा प्रयोग करून पतीला अंधारात ठेऊन आपण हे सर्व करू, असा विश्वासही देण्यात आला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ही महिला नियमित तपासणीसाठी वाय. सी. एम. रूग्णालयात आली खरी. परंतु, तेथून ती बेपत्ता झाली. या बंगाली जादूगारांच्या संमोहनाला बळी पडून आपली पत्नी त्यांच्याबरोबर पश्चिम बंगालला गेल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. याबाबत त्याने पोलिस चौकीशी संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांमध्ये सर्वपित्री अमवस्या असून, काळी जादू करणारी मंडळी या दिवशी गर्भवती महिलेचा नरबळी देणार आहे, अशी तक्रार महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात दिली.
त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या अपहरणाचा तपास घेण्यासाठी वाय सी एम रूग्णालयाचे सी.सी. टी.व्ही. फुटेज तपासले. पहिल्या फुटेजमध्ये सदर महिला रिक्षात बसून गेल्याचे दिसून आले. सदर रिक्षा क्रमांकावरून पोलिसांनी रिक्षा चालकाची माहिती व फोन नंबर मिळविला आणि त्याच फोन करून पोलिस चौकीत हजर होण्याचे आदेश दिले. परंतु, त्यानंतर सदरचा फोन बंद करून सदर रिक्षा चालक बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले.
दोन दिवस झाले तरी तपास मात्र नाहीच
या एवढ्याच तपासात दोन दिवस लोटले असून, आज सर्वपित्री अमवस्येचा दिवस उजाडला आहे. त्यामुळे आज आपल्या पत्नीचा नरबळी दिला जाणार असल्याची त्याने दाट शक्यता व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. पतीच्या सांगण्यानुसार, ही गोष्ट खरी असेल तर खरोखरच सदर गर्भवती महिलेचा आज बळी जाणार काय? यावर चर्चा सुरू आहे. आता पोलिस तपासात या महिलेचा खरच शोध लागणार काय? याची वाट सर्वच जण पाहत आहेत.