लोणी काळभोर, ( पुणे ) : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एका कनिष्ठ अधिकाऱ्याचा तुम्हाला फोन आला तर, संबधित अधिकारी महोदयाशी अगदी हळु आवाजात व अदबीने बोला.. जर तुम्ही तुमच्या नैसर्गिक आवाजात बोलण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला पंचवीस हजारापासुन ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा भुर्दंड पडु शकतो तर कधी कधी संबधित अधिकाऱ्याचा मारही खावा लागु शकतो.. यांमुळे तुम्हाला लोणी काळभोर पोलीस ठाण्यातुन कनिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आलाच तर, तुमचा आवाज खालीच ठेवा, अन्यथा जेब खाली हो जायेगी…
१९७० च्या दशकात आलेला हिंदी ब्लाॅक बस्टर सिनेमा ” शोले ” मध्ये असाच एक संवाद होता. “यहांसे पचास पचास कोस दूर बच्चा जब रोता है तो मां कहती है, बेटा चुप हो जा नही तो गब्बरसिंग आ जायेगा” ! लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याच गब्बरसिंगची पुनरावृत्ती निर्माण झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी जय किंवा वीरु बनून त्याचा निपाःत कधी करणार आहेत. याची वाट परिसरातील सामान्य जनता पहात आहे.
पोलिसांशी बोलतांना आवाज वाढवल्याचे कारण पुढे करत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजु झालेल्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याने लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील एका दाढीवाल्याला हाताशी धरुन, मागील आठ दिवसाच्या काळात तीन जणांना पोलीस ठाण्यात बोलावून लाखोंची पिळवणुक केल्याची चर्चा आहे. संबधित अधिकारी नव्याने रुजु झालेला असला तरी, मागील आठ दिवसांच्या काळात साऊथच्या सिनेमातील पोलिस अधिकाऱ्यासारखी दादागिरी सुरु केल्याची चर्चा आहे. एक रिक्षावाला, सिमेंटवाला व गुऱ्हाळवाल्याला पोलिस ठाण्यात बोलावुन, मारहाणीची धमकी देण्याबरोबरच, गोरगरीबांची आर्थिक पिळवणुक सुरु केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पहिल्या घटनेत वरील अधिकारी हडपसर हुन लोणी काळभोरकडे येत असतांना, अधिकारी महोदयाच्या चारचाकीसमोर एक रिक्षा आली. अधिकाऱ्यांच्या वाहनासमोर रिक्षा आल्याने, त्यांना त्यांचा मोठा अपमान झाल्याचे जाणवले. यावर त्यांनी तत्काळ संबधित रिक्षा चालकाला शिवीगाळ करुन, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यास कारवाईची धमकी दिली. तसेच एका दाढीवाल्याच्या मदतीने संबधित रिक्षा चालकाचा पत्ता काढुन, रिक्षावाल्याला बोलावुन मारहाण करण्याची व आत टाकण्याची धमकी दिली. या घटनेत रिक्षावाल्याने अधिकारी महोदयाशी बोलताना आवाज वाढवल्याचा राग आल्याचेही अधिकाऱी महोदयानी रिक्षा वाल्याला सांगुन, आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली.
दुसऱ्या एका घटनेत ऊसाच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका परप्रांतीय नागरिकाला मारहाण करून तुझ्या येथे बालकामगार काम करतात अशी धमकी देऊन वरील अधिकारी व त्यांच्या दाढीवाल्या मित्रांने १५ हजार घेऊन गेल्याची धक्कादायक घटना दोन दिवसापुर्वी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर परप्रांतीय नागरिक त्याच्या कुटुंबीयासमवेत लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत राहत आहे. तसेच त्याच ठिकाणी एक उसाचे गुऱ्हाळ असून त्या ठिकाणी काम करीत आहे. गुऱ्हाळावर काम करीत असताना त्या ठिकाणी आणखी कामगारांबरोबर काम सुरु होते. त्यावेळी त्यांच्यात आपसात वाद झाला. त्यामुळे सदर व्यक्तीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात येऊन त्या व्यक्तीची तक्रार देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी सदर व्यक्तीला समज देऊन कोणत्याही प्रकारची तक्रार घेतली नाही. त्यानंतर वाद झालेल्या कामगारांचा वाद हा आपापसात मिटला. तरीही लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी एका स्थानिक नागरिकाच्या मोबाईल फोनवरून वारंवार फोन करून शिवीगाळ करून पैशाची मागणी करीत होता.
यावेळी सदर कामगाराने एका स्थानिक पत्रकाराशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. यावेळी सदर नागरिकाने पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकाचा फोन उचलणे टाळले. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने स्व:ताच्या मोबाईल फोनवरून सदर व्यक्तीला फोन करून त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. व तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी येत आहे. त्यानुसार कर्मचाऱ्याने सदरचा पत्ता दिला.
दरम्यान, सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी जाऊन त्या कर्मचाऱ्यांला फोन उचलत नाही म्हणून मोबाईल फोन मध्ये रेकॉर्डिंग करतो काय म्हणून मारहाण केली. तसेच त्याच्याजवळ असलेला मोबाईल फोन काढून घेतला. तसेच त्याला दमदाटी करून तुझ्या येथे बालकामगार काम करतात. म्हणून तुझ्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतो अशी धमकी देऊन त्याच्याकडून १५ हजार रुपये घेऊन गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोर पोलिसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभारले आहे.
तर तिसऱ्या घटनेत गुऱ्हाळ चालकावर कारवाई कऱण्यासाठी जात असतांना, अधिकारी महोदयांनी सिंमेंटचे पाईप बनविणाऱ्या एका उद्योजकाला, बोलतांना हळु आवाजात व अदबीने बोलत नसल्याच्या कारणावरुन पोलिस ठाण्यात बोलविले. व संबधित उद्योजकाला त्रास दिल्याची घटना घडली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एक कनिष्ठ अधिकारी त्याच्या विचित्र वागण्यामुळे चर्चेच आला आहे. मागील आठ दिवसात तीन घटना उघड झालेल्या असल्या तरी, असे आणखी कांही प्रकार संबधित अधिकाऱ्याने केले असावेत अशी शंका आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लोणी काळभोर ग्रामस्थांनी केली आहे.