फिझा शेख
दौंड : कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीतील केमिकल बनविणाऱ्या शोगन कंपनीत रिऍक्टरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (ता.८) दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुंभ येथील शोगन या कंपनीतून मच्छर प्रतिबंधक व इतरही प्रकारचे रसायने बनविण्यात येतात. शोगन कंपनीत आज मंगळवारी तांत्रिक दोषामुळे रिऍक्टरचा स्फोट झाला आणि कंपनीला भीषण आग लागली. त्यात कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यावेळी तेथे किती कामगार कार्यरत होते याची माहिती मिळाली नाही. परंतु, प्राथमिक माहितीनुसार जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान कुरकुंभ एमआयडीसी रसायन क्षेत्रातील एमआयडीसी असून, येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. यापूर्वी अनेकदा घटना घडल्यानंतर काळजी घेऊनही वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने येथे अपघात प्रतिबंधासाठी दीर्घकालीन सुरक्षा योजना आमलात आणण्याची आवश्यकता आहे.