पुणे : पुणे शहरात शाळा, कॉलेजच्या परिसरात छुप्या पद्धतीने प्रतिबंधित ई-सिगारेटची शहर परिसरात अवैधरीत्या ई-सिगारेट विक्री करणाऱ्या विविध नऊ ठिकाणी छापेमारी करून गुन्हे शाखेने सुमारे १० लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात शाळा, कॉलेजच्या परिसरात छुप्या पद्धतीने प्रतिबंधित ई-सिगारेटची विक्री होत असल्याच्या तक्रारी सर्वसामान्य नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ई-सिगारेट विक्रेत्यांची गोपनीय माहिती काढली.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या वतीने लष्कर, कोरेगाव पार्क, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी नऊ ठिकाणी छापा टाकण्यात आला.
दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी १ लाख ५२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित ई-सिगारेटचा साठा जप्त केला. या विक्रेत्यांवर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादक, पुरवठा व वितरण विनिमय) अधिनियमनुसार कारवाई करण्यात आली असून मागील अनेक दिवसांनंतर गुन्हे शाखेने ई-सिगारेट विक्रेत्यांवर केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.