Pune News पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सरावादरम्यान विद्यार्थ्याच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागल्यानंतर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात संबंधित शिक्षकाला सात वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी जाधव यांनी सुनावली आहे.
अकरा वर्षांनंतर मुलाच्या पालकांना न्याय…!
दंडाच्या रकमेतील तीन लाख रुपये मृत विद्यार्थ्याच्या पालकांना भरपाई स्वरुपात देण्यात यावे. दंड न भरल्यास एक वर्षाचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर मुलाच्या पालकांना न्याय मिळाला आहे. पराग देवेंद्र इंगळे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पाषाण येथील लॉयला शाळेचा विद्यार्थी होता.
१ फेब्रुवारी २०१३ रोजी राष्ट्रीय छात्र सेनेच्या सरावादरम्यान त्याच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागली होती. त्यानंतर त्याला लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर शस्त्रक्रीयाही करण्यात आली, मात्र त्यानंतर तीन वर्षे पराग कोमात होता. ७ जानेवारी २०१६ रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी घाणेकर यांच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आमोद घाणेकरवर दाखल सदोष मनुष्य वधाचे कलम वगळण्यात यावे, अशी मागणी घाणेकर यांनी न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली.