Pune News : पुणे : मामा आणि भाच्याचे नाते जिव्हाळ्याचे मानले जाते. मात्र, माथेपीरू भाचा मामाच्याच जीवावर उठल्याच्या घटनेत भाच्याला दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मामाच्या नाकाला लावलेला ऑक्सिजन मास्क काढून, त्यांच्या नाका-तोंडावर टॉवेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न भाच्याने केला होता. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
जीवे मारण्याचा प्रयत्न
नारायणगाव येथील डॉ. मनू मेहता हॉस्पिटलमध्ये पुरुषोत्तम मधुकर कुलकर्णी (रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) हे ९ मे २०१२ रोजी पहाटे विषबाधा झाल्याने आयसीयूमध्ये उपचार घेत होते. फिर्यादी विशाल विजय कुलकर्णी (रा. बोटा, ता. संगमनेर) याचा मावसभाऊ आरोपी विठ्ठल एकनाथ असलेकर (रा. जांबूत, ता. शिरुर) याचे आई-वडिलांसोबत झालेले भांडण मामा पुरुषोत्तम याने मिटवले नाही, याचा राग त्याच्या मनात होता. याच रागातून आरोपीने उपचारासाठी नाकाला लावलेला ऑक्सिजनचा मास्क काढून नाक-तोंडावर टॉवेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, या गुन्ह्याचा पोलीस तपास करत होते. या गुन्ह्यात आरोपीला दोषी ठरवून न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी दोन वर्षे सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तसेच एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आवताडे यांनी केला होता. सरकारी वकील देशमुख व रासकर यांनी काम पाहिले.